लहान असताना वाचनाची गोडी लागण्यात जसा आईवडिलांचा प्रभाव होता, तशी आणखी एक महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे अगदी बाळबोध भाषेत असणारी, 3 किंवा 5 किंवा डोक्यावरून पाणी 10 रुपये अशा किमतीत मिळणारी काही पुस्तकं. ही पुस्तकं वय वर्ष 4 ते 10 अशा वयोगटासाठी असल्याने त्यातल्या कथेला साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे भानगडी अजिबात नसायच्या. लहान मुलांना गुंतवून ठेवणारे कथानक हा एकमेव निकष मात्र त्यात कसोशीने पाळला जायचा.
ठकठक, चांदोबा, सिंहासन बत्तीशी, चंपक या किंवा तत्सम पुस्तकांना एक ठराविक कथासूत्र होतं. त्यांचा स्वतःचा एक साचा असायचा व तो प्रचंड लोकप्रियही होता. पण ही पुस्तकं वाचण्याइतपत वाचनाचा संयम ज्यातून उपजला, ती पुस्तकं मात्र सर्वथा वेगळी. पुस्तकाचं नावच असं की मुलं अगदी रडून भेकुन ती पुस्तकं घ्यायला भाग पाडायची. जादूचा रत्नमहाल, ब्रह्मराक्षसाचा संताप, जादूची गुहा, करामती कोट, भुताचा केस अशा नावाची ही पुस्तकं असायची. त्यावर 2 किंवा फारतर 3 रंगांत छापलेले चित्र. ठळक अक्षरात नाव. बरं चित्रात फार काही इंटरेस्ट नसणार हे गृहीत धरूनच काढली असावीत अशा थाटाची चित्र त्यावर असायची. विषयाशी इमानदार. जादूची बाटली नाव असेल तर फक्त बाटलीचे चित्र, त्याभोवती प्रकाश. विषय संपला. पुस्तकाची पृष्ठसंख्या दुष्काळीच. जेमतेम 20. अगदीच एखादे पुस्तक 2 किंवा 3 स्टोऱ्यांवाले असेल. त्यापेक्षा जास्त जाड असले तर ते पुस्तक तेव्हा परकं वाटायचं.
या पुस्तकांत फारसं पाल्हाळ अजिबात नसायचं. नेमकं लिखाण. विषय अगदी पहिल्याच पानावर समजेल असा. राजकन्या असली तर राजकुमार हवाच. त्यांना वेगळं करणारा राक्षस किंवा राजकुमाराला पण म्हणून ठेवलेल्या काही अचाट अटी. आमचा राजकुमार शेवटच्या पानावर अटी पूर्ण करून राजकुमारीसह सुखाने राज्य करू लागलेला असायचा..! भूत, पऱ्या, राक्षस, जादूची एखादी वस्तू, चेटकीण या गोष्टी म्हणजे या पुस्तकांचा आत्मा होता. हे असं का? कसं? हे प्रश्न न पडणारं ते वय असल्याने राजकुमार नेहमीच सुपरहिरो असायचा. मोठेपणी तू काय होणार? या प्रश्नाचं उत्तर बिनदिक्कत "मी राजपुत्र अमुक तमुक होणार.." असं देऊ शकायचो, इतपत या पुस्तकांचं गारुड मनावर होतं.
या पुस्तकांचे लेखक बिचारे अभागीच म्हणावे लागतील. कारण पुस्तकांचं नाव आणि कथा लक्षात असल्या तरी लेखक कोण होते, हे शप्पथ आठवत नाही. प्रकाशन आणि इतर गोष्टींचा आनंदच. कारण ते वयच तसं होतं. लेखक वा प्रकाशन पाहून पुस्तक वाचावं की वाचू नये, हे ठरवण्याची अक्कल किंवा खरंतर मूर्खपणा तोवर शिकता आला नव्हता. पुस्तक वाचण्याचा बेभानपणा तेव्हा मनसोक्त अनुभवला. एखादं हवं असलेलं पुस्तक कधी मिळालं, तर तो आनंद अवर्णनीय. जेवतांनाही ते पुस्तक दूर ठेवणं विरहदायी वाटावं, एवढी त्याची मोहिनी असायची.
नंतर सावकाश वय वाढत गेलं आणि या पुस्तकांचं आकर्षण कमी होत गेलं. मात्र वाचनाची सवय यांनी कायमची लावली. राजपुत्राची जागा विक्रम वेताळ, इसापनीती, मग काळानुरूप नेते, प्रसिद्ध व्यक्ती हे घेत गेले. पुस्तकांचे प्रकार ठरत गेले. शाळेत असताना मित्रांनी आणलेली हैदोस, ग्रेट ऍपलसारखी अडल्ट पुस्तकंही वाचली होती. त्या पुस्तकांनी किमान त्या क्षणी तरी मनात प्रचंड खळबळ माजवली होती. मी त्याच सुमारास यौवनसुरक्षा वगैरे आसारामबापू छाप पुस्तकंही वाचली असल्याने मित्रांना विनाकारण ज्युनिअर बापू बनून उपदेश देऊन त्यांचा रोष ओढवून घेतला होता. आता त्याचं त्यांना आणि मला दोघांनाही हसू येत असलं, तरी ती त्या क्षणांची गंमत होती आणि ती आम्ही पुरेपूर अनुभवली होती.
हळूहळू मी अमुकच वाचतो, तमुक मी वाचतच नाही, मी याच लेखकांची वाचतो असं एक स्वतःच स्वतःच्या छंदाचं केलेलं वर्गीकरण तयार झालं. पुस्तकं, मग कादंबऱ्या, त्यातून लागलेलं इतिहासवाचनाचं वेड, संदर्भग्रंथांची ओळख, त्यातून वस्तुनिष्ठ इतिहासाची ओळख ही स्थित्यंतरं आपोआप घडत गेली. इंग्रजीची भीती असणारा मी घाबरत का असेना, काही पुस्तकं वाचू लागलो. हे आपल्याला समजतंय, हा आनंद एखाद्या नशेसारखा असतो. नशेचं प्रमाण वाढत जातं आणि किक मात्र कमी होत जाते, तसं अनेकदा आनंदाच्या बाबतीत असतं. त्याच गोष्टीतून वारंवार तितकाच आनंद मिळेल, असं नसतं. आपण नवीन आनंद शोधायला लागतो. वाचनाचंही तसंच झालं. नवीन नवीन विषय, नवीन लेखक, नवे साहित्यप्रकार यांचा परिचय यातून होत गेला.
राक्षस हा नेहमी वाईट असतो पासून तो राक्षस जन्माला का आला असावा, कशामुळे त्याला राक्षस बनावं लागलं, येथपर्यंतचा हा प्रवास. तो पुस्तकांचाच नाही तर विचारांचाही आहे. या प्रवासात पु.ल., व.पु., रामदास, राजवाडे, मिरासदार, जी ए, विवेकानंद, आंबेडकर, सावरकर असे असंख्य सोबती मिळाले आहेत, असंख्य मिळणार आहेत. हा प्रवास असाच चालू राहणार आहे. पण या प्रवासाची सुरुवात ज्यांनी केली ते छोट्या पुस्तकांचे लेखक मात्र हरवलेत.!!!
-© सागर कुलकर्णी
कुछ और सबक़ हम को ज़माने ने सिखाए
कुछ और सबक़ हम ने किताबों में पढ़े थे।
- हस्तीमल हस्ती