मिर्झा_गालिब
--------------------------------------------------------*************************************
अनेकदा सुमार दर्जाच्या विनोदांमध्ये तसलेच सुमार शेर(?) वगैरे ऐकवताना शेवट "गालिबच्या" नावाने होतो. गालिब काय चीज आहे, हे ज्यांना माहिती नसेल तेच असं करतात. कारण "गालिब" हे मिर्झा असदुल्लाह खान या शायराचा स्वतःबद्दलचा स्वाभिमान दाखवणारे अगदी चपखल 'तखल्लुस' (टोपण नाव) आहे. गालिबचा अर्थच मुळी होतो "सर्वश्रेष्ठ"...! सर्वांत वरचढ..!!! त्याने याच अभिमानी वृत्तीने खालील शेर रचला आहे.याचा अर्थ समजून घेतला,तर खरोखर गालिबचे कौतुक वाटते.
"है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे।
कहते है कि गालिबका है अंदाजे-बयाॅं और।।"
दुनियेत कित्येक प्रसिद्ध शायर आहेत..पण असे म्हणतात (म्हणणारा स्वतः गालिबच..!) कि गालिबची व्यक्त होण्याची शैली काही औरच..निराळी..तिला तुलनाच नाही..!!!
गालिब एक बहुरंगी,बहुआयामी व्यक्तीमत्वाचा धनी होता. स्वतःचा स्वाभिमान जपणारा होता.पण म्हणून गालिब ने इतरांचा कधीही द्वेष केला नाही.आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीचे दिलखुलास पणे कौतुक करणारा रसिक होता. अठराव्या शतकातील "मीर तकी मीर" हे एक महान शायर होऊन गेले.त्यांनी नवख्या गालिबच्या उमेदीच्या काळातील शेर ऐकून भाकित केले होते की "हा मुलगा पुढे महान शायर बनू शकेल.." गालिबने याची जाणिव ठेवून मीर तकी मीर विषयी एक शेर रचला.पण गंमत म्हणजे यातही गालिबने स्वतःचे कौतुक अगोदर केले..!!! बघाच हा शेर...
"रेख्ते के तुमही उस्ताद नहीं हो गालिब।
"कहते है, अगले जमानेमें कोई 'मीर' भी था॥"
यात तो म्हणतो की गालिब, शायरीचा तू काही एकटाच उस्ताद नाहीस..(बघा...स्वाभिमान..!!!) असं म्हणतात की तुझ्या अगोदर कोणी "मीर" ही मोठा शायर होऊन गेला आहे..!
अनेकदा मनुष्याच्या जीवनात काही गंभीर प्रसंग येतात. जे धैर्यशील असतात, ते दुःखाला तोंड देऊन जीवनाची गाडी पुढे ढकलतात.पण काही लोक हळवे,तरल मनाचे असतात व त्यांना दुःख सहन करणं कठीण असतं.जर असे प्रसंग सतत आले तर त्यांची परमेश्वराकडे हीच तक्रार असते की ऐ काश कही ऐसा होता...की दो दिल होते सीने में...!
गालिबच्या आयुष्यातही अनेक दु:खे आली. ती झेलायला,सोसायला आपले एकच हृदय अपुरे आहे ,अशी गालिबची तक्रार होती. ती व्यक्त करणारा शेर त्याने रचला आहे.
"मेरी किस्मत में गम गर इतना था।
दिल भी या रब कई दिये होते॥"
हे परमेश्वरा....जर माझ्या नशिबात जर इतकी भरमसाठ दुःखे होती,तर ती सहन करण्यासाठी तेवढीच हृदयेही दिली असतीस रे...!!!
हजरजबाबी गालिब :
गालिबचाच समकालिन शायर म्हणजे "शेख इब्राहिम जौक". गालिबचा याच्यावर राग असे. कारण जौक हा गालिबच्या तुलनेत काहीसा कमी प्रतिभावान असूनही दिल्लीचा बादशाहा बहादूरशहा जफर याचा राजकवी होता. या मुळे गालिब त्याला टोला मारण्याची संधीच शोधत असे. असाच हा एक किस्सा आहे.
गालिबला एकदा हे जौक साहेब दरबारात जाताना दिसले. गालिब सर्वांना ऐकू जाईल,अशा आवाजात म्हणाला, "हुआ है शाह का मुसाहिब..,फिरे है इतराता.." म्हणजे बादशाहाच्या आश्रयाला असल्याने बघा कसा तोर्यात फिरतो.! लोक हसले..! झाले.!! जौक ने हे ऐकले व दरबारात गेल्यावर सर्वात अगोदर बादशाहाला सर्व सांगितले.आता राजकवीचा अपमान म्हणजे बादशाहाच अपमान..! ताबडतोब सैनिक पाठवुन गालिबला हजर करण्याचे फर्मान निघाले.सैनिक गालिबला घेऊन दरबारात निघाले.खरी गंमत इथेच सुरू होते.
दरबारात गेल्यावर गालिबला सजा फर्मावली जाणार याविषयी कोणालाही शंका नव्हती.जौकच्या मनात तर आनंदाच्या उकळ्याच फूटत होत्या! पण शीघ्रकवी गालिबने दरबारात जाईपर्यंत मनातल्या मनात पुढचा भाग रचून शेर पूर्णही केला होता..!! दरबारात गेल्यावर गालिबला जाब विचारण्यात आला.याने अगदी साळसूदपणे म्हटले,
"जहापनाॅह..हा तर अर्धाच शेर आहे.पूर्ण शेर आपल्याला मी ऐकवतो."
"हुआ है शाहका मुसाहिब,फिरे है इतराता..।"
"वगरनः शहर में गालिबकी आबरू क्या है?"
" बाहशाहाच्या आश्रयानेच तु या शहरात ऐवढ्या तोर्यात राहतोस गालिब,नाहीतर या शहरात तुझी काय अब्रु आहे..??"
आता हे ऐकून गालिबला जौक किंवा बादशाहा काय बोलणार? जौकच्या आनंदाला गालिबने अगदी सहजपणे धोबीपछाड दिली..!!
आयुष्याचे सार :
आयुष्यात आपल्याला स्वतःच्या अनेक इच्छा पूर्ण कराव्याशा वाटतात.यशस्वी ठरण्याचे आपले स्वतःचेच वेगळे मानदंड असतात. त्यातील काही आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण करतो.तर काही गोष्टींसाठी अफाट प्रयत्न करुनही न त्यांची पुर्तता करणे शक्य होत नाही.अशावेळेस आपण "नशिबातच नव्हतं हो..!!" म्हणतो आणि हळहळत बसतो.
पण गालिबने नशीबाला यासाठी दोषी अजिबात ठरवले नाही.त्याने आपल्या असंतोषाला कारण आपणच असतो,हे अगदी थोडक्यात सांगतांना "असमाधानी मन" हे याचे उगमस्थान असल्याचे म्हटले अाहे.आपले ध्येय आपणच ठरवतो व त्यानुसार आपले यशापशय अवलंबून असते,हे तो दोन ओळींत सांगतो.
"रास्ते कहाॅ खत्म होतें है जिंदगी के सफर में.."
"मंझिल तो वही हैं जहाॅ ख्वाहिशें थम जाऐं।"
भगवान बुद्ध ही हिच गोष्ट वेगळ्या शब्दांत सांगतात, *"अपेक्षा हेच सर्व दुःखाचे मुळ आहे..!"
-सागर कुलकर्णी
