आकाशकन्या डॉ. कल्पना चावला


            


आकाशकन्या डॉ. कल्पना चावला 

           

 अवकाशातून पृथ्वीच्या दिशेने एक अंतराळयान ताशी २०,१२० किलोमीटर इतक्या भन्नाट वेगाने प्रवास करत होते. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर स्थानिक वेळेनुसार सकाळी ०९ वाजून १६ मिनिटांनी फ्लोरिडातील केनेडी अवकाशतळावर यान उतरणार होते. परंतु ०८ वाजून ५६ मिनिटांनी तापमानाची नोंद ठेवणारी कार्यप्रणाली बंद पडली. पुढच्या ०३ मिनिटात वातावरणाचा दाब नियंत्रित ठेवणारी यंत्रणा बंद पडली. यानात पृथ्वीवरून संदेश जात होता, To Columbia, here is Houston, we see your tire pressure messages and we did not copy your last message.” त्यावर या कोलंबिया यानाचे मोहीम प्रमुख कमांडर रिक हजबंड उत्तर द्यायला सरसावले, Roger  but…..” आणि पुढील क्षणी यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला. कमांडर रिक यांच्या या but नंतर कोलंबियातून कोणताही संदेश पृथ्वीवर पोचू शकला नाही. फ्लोरिडा अवकाशतळावर उतरण्यासाठी अवघी १६ मिनिटे बाकी असताना काही सेकंदातच संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या भीषण घटनेची नोंद इतिहासात झाली. कोलंबिया यानाचा स्फोट झाला आणि यानात असलेल्या सात अंतराळवीरांची राखसुद्धा पृथ्वीवर आली नाही. सारे काही संपले...! मायकेल एन्डरसन, लॉरेल क्लर्क, रिक हजबंड, विल्यम मेकल, इलॉन रॅमन, डेव्हिड ब्राऊन आणि कल्पना चावला या सातही अंतराळवीरांना जगाने गमावले.
कोलंबिया यानातील सात अवकाशवीर.
          दिल्लीपासुन अंदाजे १२५ किलोमीटर दूर असणाऱ्या पंजाबातील कर्नाल या गावाची रहिवासी असलेली कल्पना चावला ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला होती. आपल्या आईप्रमाणेच धार्मिक वृत्तीची असलेली अत्यंत साधेपणाने राहणारी कल्पना स्वभावाने खूप खेळकर उत्साही होती. एरोनॉटिक्ससारख्या किचकट विषयात तिला जितकी रुची होती तितकीच भारतीय शास्त्रीय संगीतातदेखील होती. म्हणूनच तर नासातर्फे प्रत्येक अंतराळवीराला स्वतःसोबत एक ऑडिओ कॅसेट नेण्यास सांगितले तेव्हा कल्पनाने पंडित रविशंकर यांच्या सतार वादनाची कॅसेट सोबत घेतली होती. अवकाशयात्रा करण्याची जिद्द बाळगून कल्पनाने पंजाब विद्यापीठातून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली आणि पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये डॉक्टरेट मिळवली आणि नासा या जगप्रसिद्ध संस्थेत संशोधक म्हणून काम करू लागली. अंतराळवीर होण्याच्या दृष्टीने कल्पनाला महत्वाची संधी लाभली ती १९९७ च्या नोव्हेंबर महिन्यात. याच कोलंबिया यानातून तिने तब्बल १६ दिवसांचा अवकाश प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. या सफरीचा अनुभव तिच्यासाठी खूप रोमहर्षक होता. तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्याशी अंतराळातून बोलताना “मै दुनिया के नये नजरे देख रही हु” या शब्दात कल्पनाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या आपल्या पहिल्या मोहिमेमध्ये तिने व सहकाऱ्यांनी धातू आणि इतर स्फटिकरूप पदार्थ अवकाशातील वजनरहित स्थितीमध्ये द्रवरुपातून स्थायुरूप अवस्थेमध्ये कसे जातात, यावर संशोधन केले होते. १९९७ च्या यशस्वी अंतराळ सफरीनंतर सहा वर्षांनी १६ जानेवारी २००३ रोजी डॉ. कल्पना चावला पुन्हा एकदा त्याच कोलंबिया यानातू आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत अवकाश सफरीवर निघाली. पण यानंतर हे सात अंतराळवीर कधीही परतले नाहीत. १९८१ सालापासून अवकाश सफरी करणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाने तब्बल २४ वेळा उड्डाणे केली होती आणि यात एकही अपघात झाला नव्हता. मात्र १६ जानेवारी २००३ च्या मोहिमेवेळेस यानाची स्थिती समाधानकारक नव्हती. यानाच्या इंधनटाकीवर असलेले उष्णतारोधक आवरण सैल झाले होते. अर्थात यामुळे फारशी काळजी करण्यासारखे नाही, असे मोहिमेचे संचालक लेरॉय केन यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. वातावरणाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर १० मिनिटांत यानापल्या नियोजित स्थळी उतरते. या १० मिनिटांत मात्र त्याचे तापमान प्रचंड वाढते. यानाचे तापमान सामान्य स्थितीत येण्यासाठी १३ मिनिटांचा कालावधी आवश्यक असतो. म्हणजे एकूण २३ मिनिटे ही एखादे अवकाश यान उतरताना अत्यंत महत्वाची असतात. कोलंबियाचा अपघात याच कालावधीत झाला. कदाचित २० वर्षांपेक्षाही जुने असल्याने या प्रचंड तापमानात यानाचा निभाव लागला नसावा.     

  
कोलंबिया अंतराळयान 
             त्या भयानक अपघातात कोलंबिया यान जरी नष्ट झाले तरी या सर्वांची कामगिरी वाया गेली नाही. निर्वात पोकळीमध्ये विविध कीटक व इतर प्राणी कसे वागतात, याचा अभ्यास करण्यासाठी मुंग्या, रेशीम अळी, भुंगा, उंदीर यांनाही अवकाशात पाठवले होते. पृथ्वीवर केलेले प्रयोग आणि अवकाशात केलेले प्रयोग यांच्या परिणामात प्रचंड तफावत असते. वजनरहित अवस्थेत केलेल्या प्रयोगांत अनेक महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवता येतात. त्यामुळे अवकाशातील प्रयोगांचे निष्कर्ष अधिक अचूक असतात. आपल्या १६ दिवसांच्या सफरीत कल्पना आणि सहकाऱ्यांनी सुमारे ८० प्रयोग केले आणि विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व प्रयोग कमालीचे यशस्वी ठरले. त्यांचे निष्कर्ष अगोदरच पृथ्वीवर पाठवले गेले होते.  निर्वात अवस्थेत मानवी मेंदू वेगळ्या पद्धतीने कार्य करतो. यासाठी देखील या मोहिमेत प्रयोग केले गेले. इंधनामध्ये असलेले घातक कण काढून टाकून अधिक ज्वलनक्षमता असलेले आणि पर्यावरणाला धोकादायक नसणारे इंधन तयार करणे शक्य असल्याचे प्रयोगाद्वारे सिद्ध करण्यात या मोहिमेत यश आले. त्याचप्रमाणे मानवी शरीर आणि कॅन्सर पेशींची वाढ या विषयांवर देखील प्रयोग करण्यात आले होते. कोलंबिया यानात करण्यात आलेल्या या प्रयोगांमुळे आपल्या पुढच्या पिढ्या कायम कल्पना चावला आणि इतर अंतराळवीरांच्या ऋणात राहणार आहेत. डॉ. कल्पना चावला यांचा जीवनप्रवास इतक्या लवकर आणि अशा भयानक प्रकारे संपला, याची खंत मात्र प्रत्येकाच्या मनात कायमची राहील...!  

सागर कुलकर्णी   

https://amzn.to/2QCz7Vf

spacer

मिर्झा गालिब - एक बहुरंगी शायर

मिर्झा_गालिब 

--------------------------------------------------------
*************************************



         अनेकदा सुमार दर्जाच्या विनोदांमध्ये तसलेच सुमार शेर(?) वगैरे ऐकवताना शेवट "गालिबच्या" नावाने होतो. गालिब काय चीज आहे, हे ज्यांना माहिती नसेल तेच असं करतात. कारण "गालिब" हे मिर्झा असदुल्लाह खान या शायराचा स्वतःबद्दलचा स्वाभिमान दाखवणारे अगदी चपखल 'तखल्लुस' (टोपण नाव) आहे. गालिबचा अर्थच मुळी होतो "सर्वश्रेष्ठ"...! सर्वांत वरचढ..!!! त्याने याच अभिमानी वृत्तीने खालील शेर रचला आहे.याचा अर्थ समजून घेतला,तर खरोखर गालिबचे कौतुक वाटते.

  "है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे।
  कहते है कि गालिबका है अंदाजे-बयाॅं और।।"

       दुनियेत कित्येक प्रसिद्ध शायर आहेत..पण असे म्हणतात (म्हणणारा स्वतः गालिबच..!) कि गालिबची व्यक्त होण्याची शैली काही औरच..निराळी..तिला तुलनाच नाही..!!!


       गालिब एक बहुरंगी,बहुआयामी व्यक्तीमत्वाचा धनी होता. स्वतःचा स्वाभिमान जपणारा होता.पण म्हणून गालिब ने इतरांचा कधीही द्वेष केला नाही.आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीचे दिलखुलास पणे कौतुक करणारा रसिक होता. अठराव्या शतकातील "मीर तकी मीर" हे एक महान शायर होऊन गेले.त्यांनी नवख्या गालिबच्या उमेदीच्या काळातील शेर ऐकून भाकित केले होते की "हा मुलगा पुढे महान शायर बनू शकेल.." गालिबने याची जाणिव ठेवून मीर तकी मीर विषयी एक शेर रचला.पण गंमत म्हणजे यातही गालिबने स्वतःचे कौतुक अगोदर केले..!!!  बघाच हा शेर...

"रेख्ते के तुमही उस्ताद नहीं हो गालिब।
  "कहते है, अगले जमानेमें कोई 'मीर' भी था॥"

   यात तो म्हणतो की गालिब, शायरीचा तू काही एकटाच उस्ताद नाहीस..(बघा...स्वाभिमान..!!!) असं म्हणतात की तुझ्या अगोदर कोणी "मीर" ही मोठा शायर होऊन गेला आहे..!



        अनेकदा मनुष्याच्या जीवनात काही गंभीर प्रसंग येतात. जे धैर्यशील असतात, ते दुःखाला तोंड देऊन जीवनाची गाडी पुढे ढकलतात.पण काही लोक हळवे,तरल मनाचे असतात व त्यांना दुःख सहन करणं कठीण असतं.जर असे प्रसंग सतत आले तर त्यांची परमेश्वराकडे हीच तक्रार असते की ऐ काश कही ऐसा होता...की दो दिल होते सीने में...!
        गालिबच्या आयुष्यातही अनेक दु:खे  आली. ती झेलायला,सोसायला आपले एकच हृदय अपुरे आहे ,अशी गालिबची तक्रार होती. ती व्यक्त करणारा शेर त्याने रचला आहे.

   "मेरी किस्मत में गम गर इतना था।
    दिल भी या रब कई दिये होते॥"

     हे परमेश्वरा....जर माझ्या नशिबात जर इतकी भरमसाठ दुःखे होती,तर ती सहन करण्यासाठी तेवढीच हृदयेही दिली असतीस रे...!!!


 हजरजबाबी गालिब :

           गालिबचाच समकालिन शायर म्हणजे "शेख इब्राहिम जौक". गालिबचा याच्यावर राग असे. कारण जौक हा गालिबच्या तुलनेत काहीसा कमी प्रतिभावान असूनही दिल्लीचा बादशाहा बहादूरशहा जफर याचा राजकवी होता. या मुळे गालिब त्याला टोला मारण्याची संधीच शोधत असे. असाच हा एक किस्सा आहे.

          गालिबला एकदा हे जौक साहेब दरबारात जाताना दिसले. गालिब सर्वांना ऐकू जाईल,अशा आवाजात म्हणाला,  "हुआ है शाह का मुसाहिब..,फिरे है इतराता.." म्हणजे बादशाहाच्या आश्रयाला असल्याने बघा कसा तोर्‍यात फिरतो.! लोक हसले..! झाले.!! जौक ने हे ऐकले व दरबारात गेल्यावर सर्वात अगोदर बादशाहाला सर्व सांगितले.आता राजकवीचा अपमान म्हणजे बादशाहाच अपमान..! ताबडतोब सैनिक पाठवुन गालिबला हजर करण्याचे फर्मान निघाले.सैनिक गालिबला घेऊन दरबारात निघाले.खरी गंमत इथेच सुरू होते.

          दरबारात गेल्यावर गालिबला सजा फर्मावली जाणार याविषयी कोणालाही शंका नव्हती.जौकच्या मनात तर आनंदाच्या उकळ्याच फूटत होत्या! पण शीघ्रकवी गालिबने दरबारात जाईपर्यंत मनातल्या मनात पुढचा भाग रचून शेर पूर्णही केला होता..!! दरबारात गेल्यावर गालिबला जाब विचारण्यात आला.याने अगदी साळसूदपणे म्हटले,

  "जहापनाॅह..हा तर अर्धाच शेर आहे.पूर्ण शेर आपल्याला मी ऐकवतो."


        "हुआ है शाहका मुसाहिब,फिरे है इतराता..।"
          "वगरनः शहर में गालिबकी आबरू क्या है?"
     
          " बाहशाहाच्या आश्रयानेच तु या शहरात ऐवढ्या तोर्‍यात राहतोस गालिब,नाहीतर या शहरात तुझी काय अब्रु आहे..??"
   
         आता हे ऐकून गालिबला जौक किंवा बादशाहा काय बोलणार? जौकच्या आनंदाला गालिबने अगदी सहजपणे धोबीपछाड दिली..!!

आयुष्याचे सार :

          आयुष्यात  आपल्याला स्वतःच्या अनेक इच्छा पूर्ण कराव्याशा वाटतात.यशस्वी ठरण्याचे आपले स्वतःचेच वेगळे मानदंड असतात. त्यातील काही आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण करतो.तर काही गोष्टींसाठी अफाट प्रयत्न करुनही न त्यांची पुर्तता करणे शक्य होत नाही.अशावेळेस आपण "नशिबातच नव्हतं हो..!!" म्हणतो आणि हळहळत बसतो.
         
        पण गालिबने नशीबाला यासाठी दोषी अजिबात ठरवले नाही.त्याने आपल्या असंतोषाला कारण आपणच असतो,हे अगदी थोडक्यात सांगतांना "असमाधानी मन" हे याचे उगमस्थान असल्याचे म्हटले अाहे.आपले ध्येय आपणच ठरवतो व त्यानुसार आपले यशापशय अवलंबून असते,हे तो दोन ओळींत सांगतो.
   
        "रास्ते कहाॅ खत्म होतें है जिंदगी के सफर में.."
        "मंझिल तो वही हैं जहाॅ ख्वाहिशें थम जाऐं।"

       भगवान बुद्ध ही हिच गोष्ट वेगळ्या शब्दांत सांगतात, *"अपेक्षा हेच सर्व दुःखाचे मुळ आहे..!"

        -सागर कुलकर्णी

spacer